मुसळधार पावसाने भातशेतीवर मोठे संकट

रत्नागिरी:- मोसमी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पडत रत्नागिरीत पडणार्‍या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. सलग दुसर्‍या दिवशी पावसाचा जोर कायम होता. रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. भांबेड (ता. लांजा) येथे भातशेती आडवी झाल्याने सुमारे एक हेक्टरचे नुकसान झाले; मात्र अन्य तालुक्यात मळभ, हलका पाऊस अशी स्थिती होती. पावसाने हळव्या भातशेतीची कापणी खोळंबली असून बळीराजा चिंतेत पडला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. 22) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात सरासरी 18.79 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 20.50, दापोली 11.80, खेड 2.90, गुहागर 28.70, चिपळूण 9.70, संगमेश्‍वर 20.50, रत्नागिरी 32.30, लांजा 28.10, राजापूर 14.60 मिमीची नोंदला. चिपळूण पेढांबेत तिन घरांचे पावसामुळे अंशत: 38 हजार 700 रुपये तर संगमेश्वर देवळेत एका घराचे पावसामुळे अंशत: 3 हजार 200 रुपयांचे नुकसान झाले.

रत्नागिरी वगळता अन्य सर्व तालुक्यात दिवसभरात अधुनमधून हलक्या पावसाच्या सरी झाल्या; मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. संगमेश्‍वरमध्ये दुपारी उन पडले होते. खेड, दापोली, गुहागरमध्येही तशीच परिस्थिती होती. रत्नागिरी, लांजा तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. रत्नागिरीत मंंगळवारीही (ता. 22) पावसाचा जोर कायम होता. लांजा तालुक्यात भांबेडमध्ये वहाळाशेजारी भातशेतीत पुराचे पाणी घुसले. तर काही ठिकाणी पावसामुळे उभी पिकं आडवी झाली. शेतात चिखल झाला असून पडलेल्या भातातून उत्पादन मिळणेच शक्यच नाही. सुमारे एक हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सायंकाळपर्यंत 11 शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले होते. अजुनही आठ ते दहा शेतकरी बाधित आहेत.

जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळी उन पडल्याने कातळावरील भात कापणी सुरु केली. पावसामुळे कापलेलं भात सुकवण्यास ठेवले आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस सुरुच राहील्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सुमारे 64 हजार हेक्टरवर भात लागवड असून हळवी म्हणजेच 105 दिवसांनी तयार होणारे सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील तीस टक्के भात कापणीयोग्य आहे. गेले आठवडाभर पावसाने म्हणावी तशी उघडीप न दिल्यामुळे हळव्याची भातशेती पावसात आडवी होण्याची भिती आहे.