मुसळधार पावसाने काजळी नदीला पूर; चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली

रत्नागिरी:- गेले दोन दिवस कोसळणार्‍या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. रत्नागिरीत सलग दोन दिवस धुवॉंधार पाऊस कोसळला. या पावसामुळे रविवारी रात्री चांदेराई बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली गेली.

दरवर्षी पावसाळ्यात चांदेराई बाजारपेठेत पुराचा धोका निर्माण होतो. यापूर्वी काजळी नदीतील गाळ उपसादेखील झाला होता. मात्र हा उपसा व्यवस्थित न झाल्याने पुराची भीती आजही कायम आहे. रविवारी सकाळपासूनच रत्नागिरीत धुवॉंधार पाऊस कोसळत होता. त्यातच हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. रविवारी रात्री उशीरा चांदेराई येथील काजळी नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे येथील व्यापार्‍यांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला होता.

कोणत्याही क्षणी पुराचे पाणी बाजारपेठेत घुसेल या भीतीने व्यापार्‍यांनी आपल्या दुकानातील सामानाची हलवाहलव करण्यास सुरूवात केली. रात्री उशीरा काजळी नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले. चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. प्रशासनानेदेखील आपली फौज तैनात केली होती. पहाटेपर्यंत येथील ग्रामस्थ पुराच्या पाण्याकडे लक्ष ठेवून होते. सकाळच्या सुमारास बाजारपेठेतील पाणी ओसरले आणि सार्‍यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.