रत्नागिरी:- राज्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह रत्नागिरीत पावसामुळे कोणत्याही क्षणी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा स्थितीत रत्नागिरीतील हवामान विभागात निद्रिस्त स्थितीत आहे. रत्नागिरीतील नाचणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागाला कुलूप लावण्यात आले आहे. लाखो रुपये खर्च करून येथे यंत्रसामुग्री उभारण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांसह सात ते आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही कार्यालय बंद करून कर्मचारी गायब झाले आहेत.
भारत सरकारच्या हवामान खात्यांतर्गत भारतीय हवामान शास्त्र विभाग रत्नागिरीतील नाचणे येथे कार्यरत आहेत. कार्यालयाच्या इमारतीच्या बाजुला स्वयंचलित मौसम स्टेशन कार्यान्वित आहे. तर हवामानाची स्थिती दर्शवणारी यंत्रणा इमारतीच्या टेरेसवर बसविण्यात आले आहे.
हवामानाच्या बदलत्या नोंदी ठेवण्यासाठी रत्नागिरीत या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी एक अधिकारी व सात ते आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्राच्या अखत्यारीत या केंद्राचे कामकाज चालते. परंतु सद्यस्थितीत रत्नागिरीतील हवामान केंद्राला कोणीच वाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वादळी पावसाचा इशारा व आठवड्याच्या कामकाजाचा पहिलाच दिवस असलेल्या सोमवारी दुपारी 1 वाजता हवामान केंद्राला कुलूप ठोकून अधिकाऱ्यांसह कर्मचारी गायब झाले होते. हवामान केंद्राच्या आवारातच अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. तरीही कार्यालयाला कुलूप ठोकून सर्वचजण गायब होत असल्यामुळे हवामान विभाग रामभरोसे झाला आहे.
मग निवासस्थाने कशाला?
शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जेवणासाठी केवळ अर्धातास देण्यात आला आहे तर कार्यालय पूर्ण बंद न ठेवता दुपारी दोन ते अडीच या वेळेत टप्प्याटप्प्यात जेवण करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. असे असताना 7 ते 8 कर्मचारी असलेल्या हवामान केंद्राला दुपारी 1 वाजण्यापूवच कुलूप लावण्यात आले होते. यावेळी येथे आलेल्या एका कर्मचाऱ्याने जेवणासाठी गेलो होतो, आम्हाला निवासस्थाने कशाला दिलीत? असा थेट प्रश्न सरकारलाच विचारला आहे. त्याचे उत्तर आता हवामान विभागालाच द्यावे लागणार आहे.