रत्नागिरी:- मुले पळवणारी टोळी रत्नागिरीत फिरत असल्याची दहशत सध्या रत्नागिरीकरांच्या मनात आहे. याच गैरसमजातून गुरुवारी सकाळी मिस्त्री हायस्कूल येथे एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या महिलेला नंतर शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
एकामागून एक घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे रत्नागिरीकर दहशतीच्या छायेखाली आहेत. सलग झालेले दोन खून तसेच वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. अशातच काहीजण समोहित करून वयोवृद्ध नागरिकांना लुटत आहेत तसेच शहरात मुले पळवणारी टोळी देखील सक्रिय असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या आहेत. सोशल मीडियामुळे या अफवांना अधिक खतपाणी मिळत असून पालकवर्ग प्रचंड दबावाखाली आहे. यातूनच काही गैरप्रकार देखील घडत आहेत.
असाच एक प्रकार गुरुवारी सकाळी शहरातील मिस्त्री हायस्कूल येथे घडला. या परिसरात एक महिला आर्थिक मदत मागण्यासाठी फिरत होती. ही महिला मिस्त्री हायस्कूल येथे पोहचल्यानंतर शाळेत मीटिंग साठी उपस्थित पालकांनी महिला शाळेच्या कंपाऊंड मध्ये दाखल झालीच कशी असा सवाल उपस्थित केला. महिलेला प्रश्न विचारल्यानंतर त्याची समर्पक उत्तर महिलेला न देता आल्याने पालकवर्ग अधिकच आक्रमक झाला. मुलं पळविण्यासाठी तर महिला आली नाही ना? असा समज करून घेत महिला पालक त्या महिलेच्या अंगावर गेली तसेच तिला मारहाण देखील करण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तत्काळ व्हायरल झाला. यानंतर या महिलेला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर पोलिस त्या महिलेची चौकशी केली आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.