मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी जिल्ह्याला 39 किट

रत्नागिरी:- आरोग्य, लसीकरण याबाबतची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी मुलांची आधारकार्ड काढण्यात येत आहेत. मुलांची आधारकार्ड काढण्यासाठी अंगणवाडीमध्ये किट बसविण्यात आली आहेत. जिल्ह्याला 39 किट मिळाली आहेत. लवकरच आधारकार्ड काढण्यास प्रारंभ होणार आहे.

पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी पोस्ट कार्यालय, बँक, महाईसेवा केंद्रात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता यापुढे भासणार नाही. शिवाय आधारकार्ड नूतनीकरणही अंगणवाडीत करता येणार आहे. महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत महिला पर्यवेक्षकांकडे आधार कार्ड कीट उपलब्ध झाली आहेत. लवकरच पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देऊन आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे पोषणआहार वितरणावरही नियंत्रण येणार आहे. ज्या अंगणवाडीमध्ये मुलांची संख्या आहे, त्याठिकाणी पोषण आहार वितरणात होणारी हेराफेरी थांबणार आहे. आधारकार्डमुळे मुलांचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवणे सुलभ होणार आहे. हेराफेरी थांबल्यास शासकीय निधीचा गैरवापर थांबणार आहे. रत्नागिरी जिल्हा मात्र गैरप्रकारापासून वंचित आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी तीन या प्रमाणे जिल्ह्यासाठी एकूण 36 आधारकार्ड यंत्रे प्राप्त झाली असून शहरासाठी तीन आहेत. त्यामुळे एकूण 39 यंत्रे प्राप्त झाली आहेत. लवकरच याबाबत प्रशिक्षण देऊन आधारकार्ड काढण्यास प्रारंभ होणार आहे. ग्रामीण भागातील पालकांची यामुळे गैरसोय दूर होणार आहे.
मुलांचे आधारकार्ड काढल्याने त्यांचे आरोग्य, लसीकरण याबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील पालक मुलांच्या लसीकरणाबाबत अनभिज्ञ असतात. लसीकरणाची माहिती आधारकार्डमुळे सुलभ होईल. सर्व माहिती आधारसोबत जोडणार आधारकार्ड काढताना जन्मदाखला जोडला जाणार आहे. त्यामुळे मुलांना शाळेत प्रवेश घेत असताना आधारकार्डमुळे जन्मदाखला, शिवाय पालकांच्या आधारकार्ड नंबरची माहिती उपलब्ध होणार आहे.