मुरुड समुद्रकिनारी डॉल्फिन सफरीची बोट उलटली

स्थानिकांच्या मदतीने नऊ जणांना वाचवण्यात यश

दापोली:- तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी डॉल्फिन सफरीसाठी गेलेली बोट परत किनाऱ्यावर येत असताना वेगवान वाऱ्यामुळे व पाण्याच्या प्रवाहामुळे उलटल्याची घटना रविवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोटीत दोन मुलांसह ८ पर्यटक व एक बोटचालक असे ९ जण होते. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत बुडणाऱ्यांना वाचवल्याने अनर्थ टळला.

रविवारी दुपारी मुरुड समुद्रकिनारी अनधिकृतरित्या वॉटर स्पोर्टस् व्यवसाय करणारी एक बोट क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन गेलेली असताना अचानक समुद्रात उलटली. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले आणि बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.

वेगवान वारा असल्याने इतर बोट बंद ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय ही बोट विनापरवाना चालवली जात असल्याचे देखील समोर आले. समुद्रकिनारी अनेकजणांकडून अन्धिकृत वॉटर स्पोर्टस् सुरू असून अशा घटनांमुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न दापोलीकरांमधून उपस्थित केला जात आहे.