रत्नागिरी:- शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देसाई यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीच्या हमीचे बंधपत्र घेण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हातखंबा गटामध्ये राजकीय वातावरण तापले होते. यातून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत हातखंबा गटात शिवसेना पक्षाकडून अॅड. सुयोग कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे या गटातून इच्छुक असलेले परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान परशुराम कदम यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावेळी मुन्ना देसाई यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या घटनेने हातखंबा येथील राजकीय वातावरण तापले होते.
निवडणुकीमध्ये हातखंबा जिल्हा परिषद गटातून सुयोग कांबळे यांचा विजय झाला तर परशुराम कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला. सुयोग कांबळे यांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान दोन गटात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पराभूत उमेदवार परशुराम कदम यांच्या घरासमोर फटाके व नारळ फोडल्याचा देखील प्रकार समोर आला होता. दरम्यान पोलिसांकडून मध्यस्थी करण्यात आल्यानंतर तणाव निवळण्यास मदत झाली होती. हातखंबा येथे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पोलिसांकडून यासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या.









