राजेश सावंत ; २० एप्रिल २०२१ लाच संपली मुदत, अभियंतेही अंधारात
रत्नागिरी:- शहरात सुरू असलेल्या सीएनजी गॅस पाइपलाइनची खोदाई बेकायदेशीर आहे. जेसीबी व पोकलेन अशा मोठ्या वाहनांचा उपयोग न करता छोट्या कंम्प्रेसरने रस्त्याची खोदाई करणे बंधनकराक आहे. तरी कंपनी जेसीबी, पोकलेनचा वापर करून खोदकाम करीत आहे. २० एप्रिल २०२१ अखेर कंपनीने रस्ता खोदाईचे काम पूर्ण करायचे होते. त्यानंतर खोदाई परवानगी नाकारली जाईल. तसेच आपली अनामत रक्क लॅप्स (जप्त ) केली जाईल, असे करारात स्पष्ट केले असताना ऑक्टोबर २०२१ मध्ये कशी खोदाई सुरू आहे. सर्वसाधारण सभेपुढे विषय ठेऊन मुदतवाढही घेतलेली नाही. अगदी बेबंदशाही आणि अटीशर्थी धाब्यावर बसवून काम सुरू आहे. यात सर्व सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे, असा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस (दक्षिण) राजेश सावंत यांनी केला.
माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी पालिकेकडे मागितलेल्या माहितीमध्ये हा सावळागोंधळ पुढे आला आहे. विशेष म्हणजे या अटीशर्थींबाबत पालिकेच्या अभियंत्यांनाही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, शहरामध्ये सीएनजी कंपनीला गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी सप्टेंबर २०१८ ला ठराव मंजूर करण्यात आला. ६ जानेवारी २०२१ च्या पत्रान्वये प्रस्तावित पाइपलाइन टाकण्यासाठी अंदाजित रक्कम १ कोटी २८ लाख ९५ हजार रुपये भरणा करण्याबाबत कंपनीला कळवण्यात आले. त्यापैकी २९ लाख रुपये फेब्रुवारी २०२१ मध्ये भरणा करण्यात आली आहे. उर्वरित ९९ लाख ९५ हजार मार्च २०२१ ला भरणा केली आहे. त्यानुसार कंपनीला शहामध्ये ८ किमी पर्यंतचे काम करण्यास अटी-शर्थीनुसार परवानगी दिली आहे. त्यामध्ये खोदकाम करताना जेसीबी किंवा पोकलेनचा वापर करू नये. कंम्प्रेसरने रस्ता खोदाई करण्यात यावी. २० एप्रिल २०२१ अखेर रस्ते खोदाई करून गॅस कनेक्शन अपार्टमेंटमध्ये जोडण्यात यावेत, अन्यथा रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर खोदकामाची परवानगी देण्यात येणार नाही.
याच दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. डांबरीकरण केल्यानंतर आपणास खोदाई करता येणार नाही तसेच आपली अनामत रक्कम जप्त केली जाईल, असे सांगण्यात आले होते. कंपनीला परवानगी नसताना आणि अधिकृत मुदतवाढीचा निर्णय झाला नसतानाही कंपनी शहरात खोदकाम करीत आहे. पालिकेचा अतिशय गलथान आणि नियोजनशुन्य कारभार सुरू असल्याचे राजेश सावंत यांनी सांगितले.