रत्नागिरी:- गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची लगबग सुरु होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेच्या मुंबईतील दसरा मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे जिल्हा दौर्यावर येणार आहेत. या घडामोडींवरून शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला किती महत्वाचा याचा अंदाज येत आहे.
मुंबईतील शिवतिर्थावर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दरवर्षी दसरा मेळावा घेऊन ज्वलंत विचार मांडले. स्व. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असणार्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला त्यामुळेच दसरा मेळावा महत्वाचा वाटत आहे. रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथील शिवसैनिकांनी त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबईत यावा,असे प्रकर्षाने वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे जिल्हा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत धुमधडाका सुरु असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी या सेनेचे माजी मंत्री रामदास कदम, विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सहकारी कामाला लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होण्याची शक्यतेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राच्या जिल्हा दौर्यावर लक्ष लागून राहिले आहे.