मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर येथे शिवसांकल्प अभियान कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

राजापूर शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर होणाऱ्या जाहिर सभेत ना. शिंदे मार्गदर्शन करणार असून या सभेची जंगी तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ही सभा होत असून या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे प्रथमच राजापुरात येत असल्याने राजापूरच्या विकासाबाबत ते काय घोषणा करणार याबाबतही उत्सुकता आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली या सभेची जोरदार तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज्यात महायुतीकडून सर्वत्र सभांचा धडका सुरू आहे. शिवसेनेकडूनही राज्यात सर्वत्र शिवसंकल्प अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे जाहिर सभा घेऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना व कामाची माहिती देऊन थेट जनतेशी संवाद साधत आहेत.

याच अभियानांतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसंकल्प अभियानासाठी राजापूरची निवड करण्यात आली आहे. राजापूर शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी भव्य सभामंडत उभारण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हॅलीकॉप्टरने राजापूर रानतळे येथे उभारण्यात आलेल्या हॅलीपॅडवर आगमन होणार आहे. तेथून ते राजापूर शासकिय विश्रामगृहावर दाखल होणार आहेत. या ठिकाणावरून ना. शिंदे जकात नाक्यावरून जवाहर चौकातुन शिवाजीपथ बंदरधक्का मार्गे राजीव गांधी क्रिडांगणावर सभास्थळी पोहचणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ना. सामंत यांसह शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, शिवसेना नेते रामदास कदम यांसह शिवसेनेचे मंत्री, खासदार व आमदार असणार आहेत.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या राजापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोकण विभागाचे पोलीस प्रमुख प्रविण पवार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा पोलीस अधिक्षक धनजंय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी ६०० पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये ५० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे प्रथमच राजापूरात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थन समितीकडून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाण्याची शक्यता आहे. तर प्रकल्प विरोधकांकडूनही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतही मुख्यमंत्री काय बोलतात याचीही उत्सुकता आहे.