मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने जिल्ह्यातील जागावाटप फॉर्म्युला

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक

रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उपनेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे महायुती समन्वयक समितीची बैठक झाली. त्यावेळी मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकसंघपणे, विजयाच्या निर्धाराने लढण्याचा संकल्प करण्यात आला. महायुतीतील जिल्ह्यातील जागावाटप हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि पूर्ण समन्वयाने ठरले असून, पक्ष शिस्त आणि विश्वास हाच आपल्या विजयाचा पाया आहे, हे या बैठकीत त्यांनी अधोरेखित केले.

तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट व २० पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणले, तर या यशाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाला जाणार आहे. हा विश्वास आणि निर्धार या बैठकीतून व्यक्त झाला. महायुतीची ही एकजूटच विजयाची हमी आहे. सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम केल्यास काय परिणाम साधता येतो, हे आपण नगरपरिषद निवडणुकीत अनुभवले आहे. तोच अनुभव, तोच आत्मविश्वास आणि ऊर्जा घेऊन महायुती आगामी निवडणुकीत जनतेसमोर जायचे आहे, असे यावेळी सामंत यांनी सांगितले.

या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड विलास पाटणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुदेश मयेकर, तालुका अध्यक्ष बंडयाशेठ साळवी, बाबू म्हाप, भाजप तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, भाजप महिला अध्यक्ष वर्षाताई ढेकणे, संजू साळवी, भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच महायुतीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.