रत्नागिरी:- मुंबई विद्यापिठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यांची पुन्हा परीक्षा घ्या असा पवित्रा घेतला जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांना याचा अनुभव आला आहे. त्यांची दखल घेत भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
कोरोनामुळे मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत. शनिवारी (ता. 3) कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा पेपर होता. ऑनलाइन प्रश्नपत्रिका दुपारी 2 वाजता मिळणार होती. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी केलेली होती. दोन वाजून गेले तरीही प्रश्नपत्रिका पोचलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. पेपरविषयी अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परिक्षेचा कालावधी 2 ते 3 वाजेपर्यंतच होता. तीन वाजून गेले तरीही प्रश्नपत्रिका न आल्याने गोंधळात भर पडली. याविषयी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांच्यापर्यंत हा विषय पोचल्यानंतर त्यांनी तातडीने यासंदर्भात पावले उचलली आहेत.
परिक्षा पध्दतीविषयी मुंबई विद्यापिठाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांची चार क्लस्टर तयार केली आहेत. एका क्लस्टरमध्ये बारा महाविद्यालये समाविष्ट असून एका महाविद्यालयाला क्लस्टरचा प्रतिनिधी बनविण्यात आले आहे. त्या महाविद्यालयाने परिक्षांवर नियंत्रण ठेवायचे आहे. परिक्षेत विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींवर पर्याय निवडून त्या सोडविण्याचे अधिकार त्या-त्या नेतृत्त्व करणार्या महाविद्यालयांवर सोपवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या उडालेल्या गोंधळासंदर्भात अॅड. पटवर्धन यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, हा विद्यापीठाचा अत्यंत बेपर्वाई कारभार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदयांच्या विधानसभा क्षेत्रात अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका प्राप्त न होणे ही दुर्दैवी बाब आहे. यावर तात्काळ निर्णय करत ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या नाहीत, त्यांच्यासाठी परत परीक्षा घ्यावी. विद्यार्थ्यांचे नुकसान तांत्रिक कारणामुळे होता नये. कोणाच्या बेपर्वाईचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी. मुलांच्या मनातील व्दीधा अवस्था संपवण्यासाठी विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढून फेर परीक्षा घेण्याचे घोषित करावे.