रत्नागिरी:- मुंबई विद्यापिठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेवेळी सर्व्हरवर अॅटॅक झाला. त्यामध्ये कोणताही घोळ झालेला नाही. 9 हजार विद्यार्थी असताना 2 लाख 50 हजारजणांनी सर्व्हर ओपन केला होता. हा सायबर हल्ला असून याची रितसर चौकशी व्हावी, म्हणून विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई विद्यापिठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेत अडथळा निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार असल्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे.
उच्च शिक्षणमंत्री यांच्या मतदारसंघात अशा पद्धतीने समस्या निर्माण होणे ही दुर्दैवी बाब आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आरोप केला होता.
याला उत्तर देताना सामंत म्हणाले, मुंबई विद्यापिठाच्या अंतिम वर्ष कला शाखेच्या ऑनलाइन परीक्षेत कोणताही घोळ झालेला नाही. नोकरीमध्ये असलेल्यांची बाहेरून परीक्षा घेतली जाते, तशी ही परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी महाराष्ट्रातील 9 हजार विद्यार्थी बसले होते. परंतु परीक्षा सुरू झाल्यानंतर या सर्व्हरवर अॅटॅक झाला. 9 हजार विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना एकदम 2 लाख 50 हजारजणांनी ती साइट ओपन केली. त्यामुळे संपूर्ण सिस्टिम कोलमडली. हा सायबर हल्ला असून त्याबाबत तक्रार केली आहे. विश्वास नांगरेपाटील यांच्याकडे तसा तक्रार अर्ज दिला आहे. याची चौकशी होऊन संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाईल. त्यामुळे माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असती तर त्याला मी उत्तर दिले असते; मात्र ज्यांनी आरोप केला आहे, त्यांना आमचे शाखाप्रमुख उत्तर देण्यास सक्षम आहेत, असा टोलाही सामंत यांनी लगावला.