राजापूर:- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील बोरघाट येथे गुरूवारी मध्यरात्री इर्टीगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईतील चार आणि राजापुरातील एक अशा 5 जणांचा मृत्यू झाला. तर 3 जण जखमी आहेत. राजापुरातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे वसीम सादीक काझी (35). तो शहरातील तालीमखाना येथे राहतो. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच राजापुरात शोककळा पसरली आहे.
वसीम काझी हा राजापुरातून पुणे व तेथून मुंबई असा इर्टीगाने प्रवास करत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. या अपघातात वसीम काझी यांच्यासह अब्दुल रहमान खान, (32, घाटकोपर), अनिल सानप, राहुलकुमार पांडे, (30, कामोठे, नवी मुंबई), आशुतोष गाडेकर (23, अंधेरी, मुंबई) यांचा मृत्यू झाला तर चालक मच्छिंद्र आंबोरे (38), अमीरउल्ला चौधरी, दीपक खैराल हे तिघे गंभीर जखमी आहेत. अस्फीया रईस चौधरी (25, कुर्ला) ही किरकोळ जखमी झाली आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. जखमी प्रवाशांना तत्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
राजापुरातील वसिम काझीच्या मृत्यूची बातमी कळताच हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.