खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील मोरवंडे नजीक झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीच्या मागे बसलेला गंभीर जखमी झाला. हा अपघात काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तिसंगी येथील संभाजी आखाडे (४३) हे आपला मित्र नरेंद्र शिरकर (२३) रा. चिपळूण कळंबट यांच्यासह होंडा शाईन या दुचाकीने तिसंगीहून चिपळूण येथे जायला निघाले होते. महामार्गावरील मोरवंडे मोदगेवाडी नजीक पुढील ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून अचानक आलेल्या टाटा सुमो कारमुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्यांची दुचाकी ट्रकला धडकून समोरून येणाऱ्या टाटा सुमो कारवर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकी चालविणारे संभाजी आखाडे हे जागीच ठार झाले तर त्यांच्या मागे बसलेला त्यांचा मित्र शिरकर गंभीर जखमी झाला. दुचाकीची टाटा सुमोला बसलेली धडक इतकी जोरदार होती कि दुचाकीच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचुर झाला.
अपघाताची खबर कळताच खेड पोलीस स्थानकांच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मदत ग्रुपचे काही सदस्यही घटनास्थळी पोहचले होते. पोलीस आणि मदत ग्रुपच्या सदस्यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिरकर याला घरडा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.