मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात दरड कोसळली

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी एक बाजू पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून, विशेषतः मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला आहे. सध्या मुंबईच्या दिशेने केवळ हलक्या वाहनांना एकेरी वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे महामार्गावरील वेग मंदावला आहे. सुदैवाने, गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक मात्र सुरळीत आहे.

या घटनेमुळे महामार्ग ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरड कोसळताना ती महामार्गाच्या संरक्षक भिंतीवर कोसळली आणि त्या भिंती देखील कोसळल्या. या घटनांमुळे महामार्गाच्या संरक्षक भिंतींनाच आता संरक्षणाची गरज असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या या भिंती अशा प्रकारे कोसळत असतील, तर कामाचा निकृष्ट दर्जा स्पष्ट दिसून येतो, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून उमटत आहे.

या दरडीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वीच अशा घटना घडल्याने भविष्यात महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाने या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.