मुंबई – गोवा महामार्गावरील आंजणारी येथे तेलाने भरलेला टँकर उलटला

लांजा:- खाद्य तेलाची वाहतूक करणारा टँकर मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. हा अपघात गुरुवारी  दुपारी एक वाजण्याच्या दरम्याने घडला. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती सुरू झाली होती. तर अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

जयप्रकाश जयराम यादव (वय ३० राहणार उत्तर प्रदेश) हा  आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक (एम एच ०४- एचवाय ४७२९) मधून खाद्यतेल घेऊन मुंबई ते गोवा असा चालला होता. दुपारी एक वाजण्याच्या दरम्याने हा टँकर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर आला असता टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे हा टँकर उतारावर महामार्गाच्या शेजारी जाऊन पलटी झाला. या अपघातामध्ये टँकर चालक हा गंभीर जखमी झाला होता. तर अपघातानंतर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची गळती सुरू झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे, हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे, राजू कांबळे,  विजयकुमार चावरे ,संजय जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे हातखंबा महामार्ग वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.

  महामार्गावर तेल गळती सुरू असल्याने संभाव्य अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता तेलगळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच सदर टँकर उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.  या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालक जयप्रकाश यादव याला प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे .अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटने प्रकरणी सायंकाळी उशिरा यांचा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.