रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गाचे काम लांबले असले तरी जानेवारी २०२४ मध्ये कोकणवासीयांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्ण होईल. डिसेंबर २०२३ महीन्यात चौपदरीकरण पुर्ण होऊन कोकणवासीयांना प्रवास करता येईल अशी माहिती केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी माहिती देताना ना. गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पाची एकूण 10 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेसचे (P-9, P-10) जवळपास 99% काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 पॅकेजेस असून यापैकी 2 पॅकेजेस (P-4, P-8)चे अनुक्रमे 92% व 98% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. दोन पॅकेजेस (P-6, P-7)साठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेस (P-2, P-3)चे अनुक्रमे 93% व 82% काम पूर्ण झाले आहे. पॅकेज (P-1) चे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल.
पनवेल-इंदापूर टप्प्यासाठी भूमी अधिग्रहण आणि पर्यावरण परवानग्या यामुळेही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उशीर झाल्याचे गडकरी म्हणाले. आता यातील सर्व बाबींची पूर्तता झाली असून कर्नाळा अभयारण्याच्या परिसरात उड्डाणपूल काढून पर्यावरणाची काळजी घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. तसेच प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा मार्ग असल्यामुळे औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज 15 हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा 13,000 कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल.