रत्नागिरी;- कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मडगावकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस नातूवाडी बोगद्यात सुमारे सव्वा तास अडकून पडली होती. गाडीपुढे आलेले गुराला इंजिनची धडक बसल्यानंतर ते बंद पडले होते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खेड येथून रेल्वेचे वीस कर्मचारी घटनास्थळी धावले. प्रत्येक प्रवाशाची विचारपूस केली गेली. हा प्रकार दुपारी सव्वा तीन वाजता घडला.
कोरोनामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. दुपारच्या सुमारास नातूवाडी बोगद्यात नेत्रावती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याची माहिती खेड स्थानकापर्यंत आली. नेत्रावतीचे इंजिन बोगद्यात शिरल्यानंतर बंद पडले. प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता; मात्र खेड येथील दुसरे इंजिन तिथे आणण्यात आले. तोपर्यंत रेल्वेच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी पोचून प्रवाशांना धीर दिला. सुदैवाने प्रवाशांना कोणताही त्रास झालेला नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही गाडी पाच वाजता मडगावकडे रवाना झाली. सुमारे सव्वातास उशिराने धावत होती.









