रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोरोना लसीकरणाची जबाबदारी रत्नागिरी नगर परिषदेकडे अधिकृरित्या दिली असेल तर मिस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर मंगळवारी झालेली चेंगराचेंगरी टळली असती. लसीकरणासंदर्भात सर्व जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची असल्याने तेच या घटनेसाठी जबाबदार असल्याचा आरोप नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत केला. अजूनही ही जबाबदारी रनपकडे दिल्यास ती स्विकारण्यास सज्ज असल्याचे आरोग्य समितीचे सभापती निमेश नायर यांनी यावेळी सांगितले.
कोरोना लस घेण्यासाठी रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथे केंद्रावर मोठी गर्दी झाली. 18 ते 44 आणि त्यापुढील वयोगटातील लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु दोन्ही लसीकरणाच्या वेगवेगळ्या वेळांचे नियोजन झाले नाही. त्यामुळे सर्वच जण एकाच वेळी जमा झाले. सकाळी 8 वा. पासूनच रांगा लागल्या होत्या. पहिल्या डोससह 45 वर्षावरील दुसर्या डोसचे लसीकरण करण्यासाठी याच केंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी 3 नंतर लसीकरण सुरू होईल, असे सांगण्यात आले.
केवळ 220 डोस आणि 500 हून अधिक लोक डोस घेण्यासाठी रांगेत होते. लसीकरणाला उशीर झाल्याने हंगामा सुरू झाला. त्यातून चेंगराचेंगरी झाली.
मिस्त्री हायस्कूल येथील चेंगराचेंगरीबाबत रनप जबाबदार असल्याचे आरोप केले जावू लागले. या पार्श्वभूमीवर येथील लसीकरणाबाबत जे काही नियोजन झाले त्यास रनप जबाबदार नाही. लसीकरणाची सर्वस्व जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची आहे. येथील लसीकरणाच्या नियोजनाबाबत 6 मे रोजी रनपला पत्र दिल्याचे सांगितले जात आहे. परंतु असे कोणतेही पत्र रनपला मिळाले नसल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले. शहरातील लसीकरणाबाबतचे सर्व अधिकार रनपला दिल्यास ती जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन नगराध्यक्ष साळवी आणि आरोग्य सभापती नायर यांनी यावेळी दिले.
जि.प. आरोग्य विभागाचे लसीकरणाबाबत योग्य नियोजन नाही. कोणालाही विश्वासात घेतले जात नाही. जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून लोकप्रतिनिधींचे फोनसुद्धा उचलले जात नाही, असे आरोपही नगराध्यक्षांनी यावेळी केले. शहरातील 15 प्रभागातील लसीकरणाचे नियोजन केले गेले पाहिजे. परंतु तशी कोणतीही तजवीज केली जात नाही. शहरात लसीकरणाची सर्व जबाबदारी जि.प.ने आमच्याकडे द्यावी, ती आम्ही योग्यरित्या पार पाडू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.