मिशन बंधारे श्रमदानामुळे दीड कोटींची बचत 

रत्नागिरी:- ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीमेंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गेले दोन महिने श्रमदानातून गावपातळीवर वनराई, कच्चे आणि विजय बंधारे उभारले जात आहेत. आतापर्यंत 1 हजार 228 बंधारे बांधण्यात यश आले असून श्रमदानामुळे सव्वा ते दीड कोटी रुपयांचे बचत झाली आहे. तसेच बंधार्‍यामध्ये एक हजार लाख लिटरहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्याचा उपयोग टंचाई निवारणासही भाजीपाला लागवडीला होतो.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी यंदा प्रत्येक ग्रामपंचायतींना दहा बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. बंधार्‍यांसाठी ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे अधिकारी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करुन बंधार्‍यांचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधीही बंधारे उभारण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी जास्तीत जास्त बंधारे उभारण्यात येत असून, त्याचा फायदा पाणी टंचाईत होणार आहे. जिल्ह्यात लोकसहभागातून 1,228 बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यात बनराई बंधारे 242, विजय बंधारे 286 आणि कच्चे बंधारे 700 असे आहेत. वनराई बंधार्‍यांच्या माध्यमातून भूजल पातळीतही वाढ होते.
ही उद्दिष्टपूर्ती करताना ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारे बांधण्याचे काम सुरू केले आहे. श्रमदानातून उभारलेल्या बंधार्‍यांमुळे पाणीटंचाई लांबण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई उशिरा होणार असल्याचे आतापासून दिसत आहे. यंदा जिल्ह्यात 4002.77 मिलीमीटर पाऊस झाला. ऑक्टोबरनंतर पुढे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यातही अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे यंदा पाणी पातळी स्थिर असून टंचाईची तिव्रता कमी राहील असा अंदाज बांधला जात आहे.
श्रमदानामधून बंधारे बांधले जात असल्याने एक ते सव्वा कोटी रुपयांची बचत झाली आहे. एका बंधार्‍याला सरासरी पंधरा हजार रुपये खर्च येतो. पिशव्यांचा आणि नाष्ट्याचा खर्च गावातील देणगीदार करत असल्यामुळे हा खर्च होत नाही. एक बंधारा सरासरी दहा मीटर रुंद, दीड मीटर उंचीचा असतो. त्यात सरासरी एक लाख लिटर पाणी साठते. जिल्ह्यात आतापर्यंत बांधलेल्या बंधार्‍यात एक हजार लाख लिटरहून अधिक पाणी साचले असावे असा अंदात कृषी विभागाने व्यक्त केला आहे.