मिऱ्या बंधाऱ्यासाठी वाढीव निधीची तरतूद मात्र कामाबाबत तडजोड नाही: उपमुख्यमंत्री 

रत्नागिरी:- मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर सुशोभिकरण करण्यासाठी आणखी ३५ ते ४० कोटी रुपयाची मागणी झाली आहे. मी उदय सामंत यांना वाढदिवसाची भेट म्हणून येत्या अर्थ संकल्पात या निधीची तरतुद करण्याचा शब्द देतो. त्यामुळे हा

बंधारा आता सव्वा दोनशे कोटीवर गेला आहे. मात्र या बंधाऱ्याच्या दर्जेदार कामाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही कामात कोणतीही खोट, उणीव, भ्रष्टाचार खपुन घेतला जाणार नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिला. 

मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाच्या भुमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत, पालकमंत्री अॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस आघाडीचे प्रमुख पदाधिकारी तसेच मिऱ्यावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
अजित पवार म्हणाले, मुरूगवाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोर टेंबे) येथे टेट्रापॉड व ग्रोयनचा धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भुमिपूजन झाले
असे मी जाहीर करतो. विकास कामांसंदर्भात बैठक घेण्यात येणार होती. मात्र बैठकीची तारीख निश्चित करताना मंत्री उदय सामंत म्हणाले, दादा बैठकीची तारीख बदला. २६ तारखेला माझा वाढदिवस आहे, तेव्हा बैठक घ्या. तुम्ही तेव्हा रत्नागिरीत आले पाहिजे. वाढदिवसाचे निमित्त साधून १६९ कोटी रुपयाच्या या बंधाऱ्याच्या कामाचे भुमिपुजन करा, असे सांगितले. या साडेतीन किमीचा टेट्रापॉडचा बंधारा, ७ ठिकाणी ग्रोयनचा धुपप्रतिबंधक बंधरा, साडे तीन किमी चार मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकाखाली महाविकास आघाडीचे  सरकार आले, तेव्हा तेव्हा चंग बांधला आहे. काही झाले तरी कोरोना, तोक्ते वादळ अशी कोणतीही संकटं आली तरी त्यावर मात करून सर्वांगिण विकासामध्ये आपले सरकार कमी पडता कामा नये. त्याला अनुसरून हे बंधाऱ्याचे काम घेतले. 

साडेतीन किमीच्या किनाऱ्याची धुप थांबवून सुरक्षित करणे हे काळाची गरज आहे. या कामात पुढील ५० वर्षांचा विचार करण्यात आला आहे. ज्यांचा वाढदिवस आहे, त्यांनी बंधाऱ्याच्या सुशोभिकरणाची सूचना केली. उदय सामांच्या वाढदिवसाची भेट म्हणून जो काही निधी लागेल तो १०० टक्के मंजूर केला जाईल हा शब्द देतो. कामात ठेकेदाराने तडजाडे करता कामा नये. वर्षानुवर्षे ते टिकले पाहिजे. कामात कोणतीही खोट, उणीव, भ्रष्टाचार खपुन घेतला जाणार नाही.