मिऱ्या – नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी १५५ कोटींचा निधी प्राप्त 

लवकरच मोबदला वाटप प्रक्रिया 

रत्नागिरी:- मिऱ्या( रत्नागिरी) नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी जागा मालकांना देण्यात येणार्या मोबदल्यासाठी सुमारे १५५ कोटींचा निधी रत्नागिरी उपविभागिय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आहे. लवकरच या निधीचे वाटप जागा मालकांना करण्यात येणार आहे.

मिऱ्या -नागपूर  महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील मिऱ्या ते आंबा(रत्नागिरी हद्द) या मार्गावरील  एकूण २८ गावातील ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जागा मालकांना मोबदला देण्यासाठी एकूण ७६० कोटी रु.ची आवश्यकता होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ४९७ कोटी रु. चा निधी उपविभागिय अधिकाऱ्यांकडे  प्राप्त झाला होता. त्यातील ४७६ कोटी रु.च्या निधीचे २४ गावातील जागा मालकांना वाटप करण्यात आले होते. तर त्या निधी मधील २१ कोटी रु.उपविभागिय कार्यालयाकडे शिल्लक होते.

दि.२० डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा १५५ कोटी रु.चा निधी उपविभागिय अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. पुर्वीचे २१ कोटी रु.धरुन एकूण १७६ कोटी रु. सध्या उपविभागिय अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहे. त्यातून एकूण २४ गावातील मोबदला वाटप पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. उर्वरीत ४ गावाच्या मोबदला वाटपासाठी ११० कोटी. रु.ची आवश्यकता आहे. तो निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

सध्या उपविभागिय अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या १७६ कोटी रु.च्या निधीचे वाटप करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यानुसार गावनिहाय निधीचे वाटप केले जाईल. नव्या वर्षात जागा मालकांना मोबदला वाटप करण्याचे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्षात मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात होणार आहे.