रत्नागिरी:- शहराजवळील समुद्रकिनारी परिसरात पंधरामाड ते मिर्या असा ग्रोयन पध्दतीचा संरक्षक बंधारा बांधला जात आहे. पंधरामाड येथील बंधार्याचे काम तांत्रित अडचणी अडकले असून शंभर मीटरचा किनारा समुद्राच्या लाटांमुळे पावसाळ्यात ढासळतो आणि पाणी लोकवस्तीत शिरते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर पत्तन विभागाकडून तात्काळ तेथे सुरक्षेसाठी मोठे दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक भाग सुरक्षित राहणार आहे.
मिर्या बंधार्याचे अलावा भागाकडील काम वेगाने सुरु आहे. परंतु मुरुगवाडा भागाकडील शंभर मीटरचे काम झाल्यानंतर पंधरामाड भागातील बंधार्याचे काम थांबले आहे. या भागात मागील पाच ते सहा वर्षात मोठ्याप्रमाणात जमिनीची धूप झाली आहे. ही धूप थांबवण्यासाठी प्रत्येक वर्षी या भागात दगडी टाकण्यात येतात. परंतु प्रचंड लाटांच्या मार्यात त्या वाहून जातात. त्यामुळे समुद्राने नगर पालिकेच्या रस्त्यासाठी असलेली जागा व स्थानिकांच्या जागाही गिळकृंत केल्या आहेत. सध्या बंधार्याचे काम सुरु असताना, यापूर्वी टाकलेल्या दगडांवरुनच बंधार्याचे काम पंधरामाड भागात सुरु झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. बंधारा बांधण्यातील तांत्रित अडथळे दूर करण्यापुर्वी पतन विभागाने या पावसाळ्यात किनारी भागातील लोकवस्तीच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत अशी मागणी पंधरा दिवसांपुर्वी माजी नगरसेवक राकेश नागवेकर, बंटी कीर व ग्रामस्थांनी पत्तन कार्यालयात अधिकार्यांकडे केली होती. सुरक्षेसाठी उपाययोजना न करताच प्रशासनाने स्थलांतराची नोटीस दिली तर नागरिकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होईल असेही सांगितले. तेव्हा पतनकडून दगड टाकण्यात येतील असे आश्वासन दिले गेले. त्यानंतर आठवडाभरातच शंभर मीटरच्या परिसरात काळे मोठे दगड टाकून धूप थांबविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. दगडांमुळे लाटांचा मारा थांबेल आणि या पावसाळ्यात पंधरामाड भागातील लोकवस्तीत पाणी शिरणार नाही. याला पतन विभागाच्या अधिकार्यांनीही दुजोरा दिला आहे.
पंधरामाड येथील 900 मीटरच्या परिसराची भुमीअभिलेखकडून मोजणी करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. पत्तन विभागाने रत्नागिरी पालिकेला 2 लाख 78 हजार रुपये वर्ग केले होते. पालिकेकडून ते भुमीअभिलेखकडे देण्यात आले आहेत. ती मोजणी लवकरात लवकर करावी असा पाठपुरावा भुमीअभिलेखच्या अधिकार्यांकडे पत्तनकडून सुरु आहे.









