मिरजोळे येथे बोलेरो कारच्या धडकेत तरुण जखमी

बोलेरो चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे २४ मे रोजी मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. समोरून भरधाव वेगाने आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीपने दुचाकीला धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे रोजी मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास संकेत मांडवकर हे त्यांच्या ताब्यातील सुझुकी ॲक्सेस (एमएच ०८/एवाय/७९९४) या दुचाकीने एमआयडीसी मिरजोळे येथून केळ्येच्या दिशेने जे. के. फाईल ते करबुडे रोडने जात होते. मिरजोळे पाटीलवाडी येथील पुलाच्या अलीकडील वळणावर आले असता, समोरून भरधाव वेगाने आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीपवरील चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, अत्यंत हयगयीने आणि बेदरकारपणे वाहन चालवले.

या बोलेरो जीपने संकेत मांडवकर यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात संकेत मांडवकर यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अपघात घडवून आणणारा अज्ञात बोलेरो चालक घटनास्थळी न थांबता, अपघाताची माहिती न देताच तेथून पळून गेला.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार शरद बबल्या काबले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भारतीय दंड संहिता कायदा २०२३ च्या कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा १८४, १३४(ब)/१८७ प्रमाणे गुन्हा.आर.नं. २३६/२०२५ अन्वये अज्ञात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार अपघात नोंदणी क्रमांक २२/२०२५ च्या चौकशीअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस फरार चालकाचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.