मिरजोळे मधलीवाडी येथे भुस्खलन

रत्नागिरी:- सततच्या पावसामुळे तालुक्यातील मिरजोळे मधलीवाडी येथील नदी किनारी भाग पुन्हा खचू लागला आहे. त्यामुळे किनार्‍यावरील भातशेती धोक्यात आली आहे. भुस्खलन थांबण्यासाठी याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्तावावर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.

मिरजोळे मधलीवाडी येथील नदी किनार्‍यावरील
मधलीवाडी खालचापाट या भागातून ही नदी वाहत असून येथे भातशेती असून काही मीटर अंतरावर लोकवस्ती आहे. नदीचे प्रवाह बदलल्यामुळे 2006 मधील अतिवृष्टीत हा प्रकार घडला होता. त्यावेळी मोठे भूस्खलन झाले होते. त्यात काही गुंठे भातशेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी संरक्षक भिंत बांधण्यासाठी मागणी केली होती. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. रत्नागिरी तालुक्यात गेले आठ दिवस सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे भुस्खलनाचे प्रकार घडू लागले आहेत. मिरजोळे येथील हा जुने दुखणे पुन्हा उफाळून आले आहे. पुर्वीच्या खचलेल्या भागाची माती ढासळू लागली आहे. याच ठिकाणी ग्रामस्थांनी भातशेती लावलेली आहे. सतत पाऊस सुरु राहीला तर हा भागही खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. याठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून 1 कोटी 35 लाखांचे अंदाजपत्रक नियोजन विभागाला दिले होते. त्यांनतर तीन महिन्यांनी सगळीकडे कोरोनाचे संकट आले; परंतु या तीन महिन्यात या अंदाजपत्रकाबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे तो प्रस्ताव रखडला आहे.

या ठिकाणी उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून काँक्रीटचा धूपप्रतिबंधक  बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे 15 ते 20 लाख खर्च झाले. पण मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे 100 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच खचू लागली आहे.