रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे पोलिसांनी विनापरवाना हातभट्टी दारु अड्यावर धाड टाकली. या धाडीत साहित्यासह १२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप वसंत जाधव (वय ४७) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरजोळे येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारु पाडण्याचा व्यवसाय सुरु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी शनिवारी साडेनऊच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी संशयित हातभट्टीची दारु बनविण्याच्या साहित्यासह सापडला. या धाडीत २ हजार ३०० रुपयांचा गुळ नवसागर मिश्रीत गरम कुजके रसायन, बॅरल, ८ हजार ६०० रुपयांचा कुजके रसायन, जुने बॅरल, १ हजार १०० रुपयांची २० लिटर गावठी दारु, ३०० रुपयांचा अॅल्युमिनियम डेग, ५० रुपयांचा चाटू आदी साहित्यासह १२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रविण पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.