मिरजोळेवासीयांना आधी मोबदला नंतरच जमीन अधिग्रहण 

रत्नागिरी:- मिरजोळे येथील प्रस्तावित विमानतळ भूसंपादनासाठी देय रक्कम जमीन असणार्‍या सर्वांच्या खात्यात जमा झाल्यावरच जमीन ताब्यात घेऊ असे आश्वासन देतानाच जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विमानतळ भुसंपादनाविषयी शिरगाव, मिरजोळे येथील वाढीव जमिन संपादित करण्याची प्रकिया सुरु आहे. यासंदर्भात काही जमिन मालकांनी विरोध दर्शविल्यानंतर मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांच्यासह तटरक्षक दलाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिरगाव तिवंदेवाडीतील ग्रामस्थांनी जमिन देण्यासाठी तयारी दर्शवली आहे; परंतु विमानतळासाठी घेण्यात येणार्‍या जागेचा मोबदला पाच पट असावा अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. तेव्हा प्रशासनाने रेडीनेकरच्या पाच पट मोबदला जमिनीला देण्यासंदर्भात निर्णय झाल्यावर संबंधितांना कळविण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच जमिन मालकांकडून मागितली जाणारी कागदपत्रे तात्काळ संबंधिताना दिली जावीत अशा सुचनाही यावेळी मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत. जोपर्यंत जमिनीचे मोबदला मालकांच्या बँक खात्यात जमा होणार नाही, तोपर्यंत ती ताब्यात घेण्यात येणार नाही अशी भुमिका मंत्री सामंत यांनी मांडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. प्रशासनाकडूनही लवकरात लवकर कार्यवाही केली जावी अशा सुचना मंत्री सामंत यांनी दिल्यामुळे भुसंपादनाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे.