मिरजोळेत अतिवृष्टीने शेतजमिनीमध्ये मोठे भुस्खलन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे मधलीवाडी-वाडकरवाडी दरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतजमीन दोन दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीमुळे पुन्हा भुस्खलन झालेले आहे. मोठ्या प्रमाणात खोलवर जमीन खचल्याने शेतकरी हताश झालेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून येथील उपाययोजना रखडल्याने ओढवलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

अतिवृष्टीच्या काळात याठिकाणी होणाऱ्या या सततच्या भूस्खलनामुळे शेती संकटात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने येथील शेतजमिनीचे मोठे भूस्खलन झाले. सुमारे 15-20 फुट खोल शेतजमीन खचली. या भूस्खलनामुळे तेथील शेत जमिन धोक्यात आलेली आहे. वर्षागणिक येथील एक-एक शेतकऱ्याची जमीन नामशेष होत असल्याचे गंभीर चित्र आहे. येथील शेतीचा ग्रामस्थांना मोठा आधार आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या शेतीक्षेत्र निसर्गाच्या दुष्टचकात सापडलेले आहे. येथील नदीकाठी असलेली येथील शेतजमिन मोठ्या गर्तेत सापडली आहे.   

 येथील नदीच्या प्रवाहाने आपला मार्ग बदलल्यामुळे एका बाजूकडील शेतजमीन धोक्यात येऊ लागली. गेल्या काही वर्षांपूर्वी नदीच्या पवाहाने बाधित झालेली थोडेसे क्षेत्र आज तेवढ्यावरच थांबलेले नाही. सन 2006 पूर्वीपासून येथील या पकाराला प्रारंभ झाला. 2006 मध्ये तर याठिकाणी मोठे भुस्खलन झाले. त्यात 5-6 शेतकऱ्यांची शेतजमीन नामशेष झाली. त्यावेळी सुमारे 2 एकर परिसरातील क्षेत्रात झालेले भूस्खलन आज सुमारे 6 ते 7 एकर क्षेत्रात झालेले आहे.  भूवैज्ञानिकांकडून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनस्तरावरून उपाययोजना करण्यासाठी तातडीने कार्यवाही त्यावेळी हाती घेण्यात आली. सन 2019 मध्ये पाटबंधारे विभागस्तरावरून येथील भूस्खलन रोखण्यासाठी 1 कोटी 35 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा पस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे पाठवण्यात आला होता.  

सन 2018 मध्ये झालेल्या भूस्खलनानंतर प्रशासनस्तरावरून येथील उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू झाली होती. मात्र आवश्यक असलेल्या अपुऱ्या निधीमुळे हा प्रस्ताव थांबला होता. मात्र त्यानंतर आपत्ती पूर निधीतून भूस्खलन रोखण्याच्या उपाययोजनांसाठी विशेष प्राधान्याने कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते त्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव त्यावेळीच पाप्त झालेला आहे. हा प्रस्ताव तातडीने पालकमंत्र्यांची मंजूरी घेतली जाणार असल्याचे सांगून त्याला मंजूरी मिळताच 2019 मध्ये पावसाळ्यानंतर भुस्खलनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक कामांच्या कार्यवाही सुरू होणार असल्याचे जिल्हा नियोजनकडून सांगण्यात आलेले होते.   

मात्र आजमितीस गेल्या तीन वर्षात कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे येथील भूस्खलनावरील उपाययोजना रखडल्या आहेत. यावर्षी देखील याठिकाणी पुन्हा दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीने मोठे भुस्खलन झालेले आहे. येथील भाउ भाटवडेकर यांची शेतजमीन खोलवर खचली आहे. त्यामुळे त्यांचे शेत उध्वस्त झालेले आहे. आणखी अतिवृष्टी झाल्यास लगतचे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना देखील धोका वाढलेला आहे. प्रतिवर्षी येथील शेतकरी उध्वस्त होत आहे, पण त्या होणाऱ्या नुकसानीच्या मदतीपासूनही शेतकरी वंचित आहेत. प्रशासनदरबारी रखडलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीमुळे येथील शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.