माजी नगरसेवक सुहेल साखरकर काढणार मोर्चा
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा प्रभाग समस्यांचा डोंगर बनला आहे. या प्रभागात रस्ते आहेत की नाही असा सवाल माजी नगरसेवक सुहेल साखरकर यांनी व्यक्त केला आहे. ऐन गणेशोत्सवात खड्डेमय झालेल्या रस्त्यांचा मोठा त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांसह या भगातील स्ट्रीट लाईट देखील चार महिन्यांपासून बंद असून प्रशासनाचे या प्रभागाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप साखरकर यांनी केला आहे.
मिरकरवाडा येथील प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. येथील राम मंदिर ते प्रसाद हॉटेल रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी करण्यात आली मात्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप साखरकर यांनी केला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हीच बाब स्ट्रीट लाईट बाबत देखील असल्याचे साखरकर यांनी सांगितले. प्रशांत हॉटेल ते कावळे वाडी या भागातील स्ट्रीट लाईट मागील चार महिने बंद अवस्थेत आहे. प्रशासनाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर रनपचे कर्मचारी येतात आणि केवळ तोंड दाखवून जातात. आलेल्या भागातील फोटो काढून काम न करताच कर्मचारी निघून जात असल्याचा आरोप साखरकर यांनी केला आहे.
मिरकरवाडा येथील समस्यांबाबत वारंवार रनप प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र कर्मचारी प्रशासनाच्या आदेशाला केराची दाखवत असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप साखरकर यांनी केला आहे. येथील रस्त्यांवरील खड्डे आणि बंद अवस्थेतील स्ट्रीट लाईट या कडे रनप प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष या विरोधात लवकरच नगर परिषदेवर मोर्चा काढणार असल्याचे माजी नगर सेवक साखरकर यांनी सांगितले.









