रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीने शाकारुन ठेवलेल्या मच्छिमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलीस बंदोबस्तात बंदरावर आले होेते. परंतु शुक्रवारी सर्वच नौका बंद असतात. त्यामुळे जेटीवर शाकारलेल्या नौकांच्या मागे इतर नौका उभ्या होत्या. त्यामुळे शाकारुन ठेवलेली एकही नौका हलवता आली नाही. मात्र शाकारुन ठेवलेल्या नौकांच्या माालकांनी पुढील दोन दिवसात आपल्या नौका हलवितो असे सांगितले आहे.
पावसाळी मासेमारी बंदी 31 मेच्या मध्यरात्रीपासून सुरु होत आहे. परंतु काही मच्छिमार नौकांची मासेमारी 10 मे पासूनच बंद झाली आहे. मासेमारी बंद झालेल्या या नौका मिरकरवाडा बंदरातील जेटीवर प्लॅस्टीक कापड आच्छादून उभ्या करुन ठेवण्यात आल्या आहेत. या शाकारलेल्या नौकांमुळे समुद्रात मासेमारी करुन बंदरात परतणार्या नौकांना अडचण होऊ लागली. त्यांच्या नौकांवरील मासळी उतरविणे व साहित्य नौकांमध्ये चढविणे जिकरीचे होऊन गेले. त्यामुळे मासेमारी करणार्या नौकांमालकांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा प्राधीकरणाकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली.
मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाच्या मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी चुकीच्या पद्धतीने शाकारुन ठेवलेल्या नौकांच्या मालकांना नोटीस बजावून त्या नौकांचा इतर नौकांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणी उभ्या करण्यास सांगितले. परंतु या नौकामालकांकडून नोटीसला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात शाकारलेल्या नौका हटविण्याचे नियोजन झाले.
मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा रक्षक, होमगार्ड आणि पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरवात झाली. शाकारुन ठेवलेल्या नौका मालकांना बोलवून त्यांच्या नौका जेटीवरुन हलवून दुसरीकडे उभ्या करण्यास सांगितले. परंतु शुक्रवार असल्याने नौकांची मासेमारी बंद असल्याने या सर्व नौका बंदरात उभ्या होत्या. त्यामुळे शाकारलेल्या नौका सुरु करुन दुसरीकडे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे या नौकांमालकांनी पुढील दोन दिवसात शाकारलेल्या नौका दुसरीकडे नेण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. ही कार्यवाही न झाल्यास फौजदारी कारवाईसह नौकांच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार नाही असा इशाराही मत्स्य व्यवसाय विकास अधिकार्यांनी यावेळी दिला.