रत्नागिरी:- आम्ही गेली चार दिवस रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा वाईट अनुभव घेत आहोत. कधीही आणि कुठेही बॉम्बहल्ल्याचा वर्षाव होत आहे. त्याने सर्व काही उद्ध्वस्त होताना आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत.
भारतीय दुतावास आमच्या संपर्कात असून आम्हाला मदत मिळत आहे; मात्र सुरक्षेसाठी आम्हाला बंकरमध्ये (भूमिगत भाग) ठेवले आहे. आमच्या खाण्याची व्यवस्था होत आहे. सुरक्षित असलो तरी या युद्धाच्या भयानक परिस्थितीतून लवकरात लवकर मायदेशी जाण्याची आमची इच्छा आहे, अशी युक्रेनमधील प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या मिरकरवाडा (रत्नागिरी) येथील विद्यार्थिनी मुस्कान सोलकर यांनी व्हिडिओ कॉलवर सांगितले.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाची झळ वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बसत आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र शासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अद्वैत कदम (देवरूख), साक्षी नरोटे (देवरूख), जान्हवी शिंदे (देवरूख), ऋषभनाथ मोलाज (चिपळूण), आकाश कोगनाक (मंडणगड), सलोनी मनेर (लांजा), ऐश्वर्या सावंत (दापोली) आणि मिरकरवाडा येथील मुस्कान सोलकर या विद्यार्थिनीचा समावेश आहे. मुस्कानच्या कुटुंबीयांशी याबाबत चर्चा केली असता, ते युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रचंड घाबरले आहेत. आपली मुलगी सुखरूप मायदेशी यावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान, मुस्कानशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला असता, युक्रेनमधील भयावह परिस्थिती तिने कथन केली. ती म्हणाली, ”गेले चार दिवस कानठळ्या बसवणारे आणि सर्व उद्ध्वस्त करून टाकणारे बॉम्बहल्ले होत आहेत. या हल्ल्याची विदारकता आम्ही प्रत्यक्ष पाहिली आहे. आमच्यासह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी एकत्र आहोत. भारतीय दुतावास आमच्या संपर्कात असून आम्हाला बंकरमध्ये म्हणजे भूमिगत भागात ठेवले आहे.
वडिलांच्या डोळ्यात आले पाणी
मुस्कानच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता, वडील मन्सूर सोलकर म्हणाले, ‘माझी मुलगी मुस्कान वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच युक्रेनला गेली. युद्धामुळे तेथील परिस्थिती भयानक आहे. मुलांचे जेवणाचे हाल झाले आहेत. बिस्किट खाऊन दिवस काढावे लागत आहेत. केंद्राने लवकरात लवकर मदत करून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. युद्ध सुरू झाले, तेव्हा आम्ही विमानाची तिकिटे काढायला सांगितली; पण ही सुविधा बंद झाल्याने मुलगी अडकली आहे. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. आता पाच मिनिटांपूर्वी आमच्याशी मुलगी बोलली. ती सुरक्षित आहे; मात्र काळजी वाटते.
सुपरमार्केट बंद होताहेत…किराणा संपतोय…
मुस्कान पुढे म्हणाली, ”आम्ही सुरक्षित आहोत; मात्र अंधार झाला की सर्व विद्युतपुरवठा खंडित करून पर्यायी प्रकाशाचा वापर केला जात आहे. युक्रेनचे लोक आता चिंतेत असून तेथील सुपरमार्केट बंद होत आहेत. किराणा संपत चालला आहे. वस्तू महाग मिळत आहेत. एटीएमबाहेर रांगा आहेत. भारतीय एटीएम कार्डची सेवा बंद पडत चालली आहे.”