मिरकरवाडा येथील कै. भागोजीशेठ कीर स्मशानभूमीला अनधिकृत बांधकामाचा विळखा

रत्नागिरी:- शहरातील कै. भागोजीशेठ कीर स्मशानभूमी भोवती अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. स्मशानभूमीत प्रवेश करण्यासाठी राहिलेली जेमतेम वाट सोडली तर अन्य सर्वच जागेवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी राजरोस अनधिकृत बांधकामे सुरू असताना रनप प्रशासन मात्र निद्रिस्त असल्याच्या भूमिकेत आहे. 

मिरकरवाडा येथील स्मशानभूमीला दानशूर भागोजीशेठ कीर स्मशानभूमी असे नामकरण करण्यात आले आहे. निम्म्या शहरातील मृत व्यक्तींच्या मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. पूर्वी स्मशानभूमीच्या बाहेरील बाजूस गाड्या उभ्या करण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र या जागेवर येथील काही भूमाफियांचा डोळा पडला असून स्मशानभूमीची जागा देखील व्यवसायासाठी बळकावळ्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रश्नाकडे सामजिक काम करणाऱ्या संस्थांनी दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 स्मशानभूमीच्या दर्शनी भागाच्या भिंतीलगतच अनधिकृतपणे पक्की बांधकामे उभी राहिली आहेत. यामुळे आता स्मशानभूमीत जाणाऱ्या नागरिकांना आपल्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याचे दिसत आहे. स्मशानभूमीच्या गेट बाहेर असणाऱ्या सुमारे ३० फुट रुंदीच्या जागेचे देखील नुकतेच सपाटीकरण झालेले दिसून येत आहे. स्मशानभूमी हा नागरिकांच्या दृष्टीकोनातून अतिशय संवेदनशील विषय आहे मात्र याभोवती होणारे अनधिकृत बांधकामाकडे प्रशासन डोळेझाक का करतंय ? याल नेमका आशीर्वाद कोणाचा ? या विरोधात कुणीच कसे बोलत नाही ? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.