मिरकरवाडा येथील कचऱ्याचा प्रश्न गंभीर; वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष: सोहेल साखरकर

रत्नागिरी:- मिरकरवाडा येथील कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न बनला आहे. अठरा – अठरा तास येथील कचरा उचलला जात नाही. तक्रार करूनही घंटा गाडी पाठवली जात नाही. अधिकारी लक्ष देत नाहीतच मात्र सीईओ देखील सहकार्य करत नाहीत यामुळे आम्ही दाद मागायची कुणाकडे असा सवाल माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांनी केला आहे.

मिरकरवाडा येथील मच्छी मार्केट, पोलीस चौकी, शाळा आणि खडक मोहल्ला येथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बाब बनला आहे. या आधी येथील कचरा दररोज सकाळी सात वाजता उचलला जात होता. मात्र आता पंधरा – पंधरा, अठरा – अठरा तास येथील कचरा उचलला जात नाहीय. या कचऱ्यात मासे आणि इतर वस्तूंचा समावेश असल्याने या भागात मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्रे यांचा वावर वाढला आहे. या बाबत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी या तक्रारीवर कोणतीच उपाययोजना केली नाही. नगर परिषदेचे सीईओ यांच्याकडे देखील मागील काही दिवसांपासून दररोज तक्रार केली जात आहे. मात्र, कुणीच याकडे लक्ष देत नाही सात वाजता उचलला जाणारा कचरा आता दुपारी बारा नंतर उचलला जात आहे. कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर तत्काळ उपाय योजना आखावी अशी मागणी माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांनी केली आहे.