मिरकरवाडा जेटी येथील खलाशाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- बोटीवर आंधोळ केल्यानंतर थंडी भरुन आलेल्या खलाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्याला तपासून मृत घोषित केले. जुम्मन लबरी थारु (वय ४७, रा. राजीकुणा, घोडाघोडी वार्ड न ६ जि. कैलाली, नेपाळ) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २४) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत जुम्मन थारु हा नेपाळी खलाशी लियाकत मस्तान यांच्या बोटीवर काम करत होता. रविवारी (ता. २३) जयगड येथून मिरकरवाडा जेटी येथे बोटीतून येत असताना बोटीवर आंघोळ केली. त्यावेळी त्याला थंडी भरुन आली. तात्काळ त्याला टेम्पोतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.