ठेकेदाराची न्यायालयात धाव, २३ जानेवारीला सुनावणी
रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यउद्योग वसाहतीच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित अंडरआर्म स्टेडियमचे काम सुरू होण्यापूर्वीच कायदेशीर कचाट्यात सापडले आहे. या स्टेडियमची संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करावी आणि कामाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी एका ठेकेदाराने न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची १५ जानेवारी रोजी होणारी सुनावणी आता २३ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
मिरकरवाडा येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून अद्ययावत अंडरआर्म स्टेडियम विकसित करण्याचे नियोजन आहे. ऑगस्ट महिन्यात या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, ठेकेदार महेश गडेवार यांच्या निविदेतील प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नसल्याचे कारण देत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची निविदा अवैध ठरवली. यामुळे दुसऱ्या मक्तेदाराला या कामाचे कंत्राट मिळाले. प्रशासनाची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत गडेवार यांनी मुख्त्यार प्रथमेश सावंत यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये संबंधित ठेकेदाराने गंभीर मागण्या केल्या आहेत. निविदा प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत ती पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, स्टेडियमच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने स्थगिती मिळावी आणि नगर परिषदेने १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असेही या दाव्यात नमूद केले आहे. आता २३ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरीत अंडरआर्म क्रिकेटचे मोठे आकर्षण असून खेळाडूंसाठी अद्ययावत स्टेडियम असावे, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला होता. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ३०० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. मात्र, काम सुरू होण्यापूर्वीच हे प्रकरण न्यायालयात गेल्याने जिल्ह्यातील खेळाडूंची प्रतीक्षा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.









