मिनी लॉकडाऊनने बाजारपेठेतील 50 कोटींची उलाढाल ठप्प

रत्नागिरी:-शासनाने मिनी लॉकडाउन केले आणि रत्नागिरीतील बाजारपेठ पूर्णतः ठप्प झाली. मेडिकल, किराणा, फळे-भाजी विक्रेते वगळता अन्य सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे रोजची सुमारे आठ कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. सहा दिवसात 50 कोटी पेक्षा अधिकची उलाढाल थंडावली आहे. भविष्यात याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. यात मोठा फटका सराफी पेढ्यांना आहे. ऐन लग्नसराईत सराफींसह कपडे दुकाने बंद झाल्यामुळे त्यात भर पडली आहे. दुकानांमध्ये काम करणार्‍यांचाही रोजगाराला ब्रेक लागला आहे.

शासनाने कडक निर्बंध लागू केले. यामध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता बाजारपेठेतील अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. यावर व्यापारी संतापले असून दरदिवशी विविध प्रकारची आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील छोट्या-छोट्या बाजारपेठांमध्ये कपडे, ज्वेलरी, चप्पल, मोबाईल यांसह अन्य प्रकारची सुमारे दीड हजार दुकाने आहेत. शासनाच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाली असून रोजचे व्यवहारही थांबले आहेत. मंगळवारी (ता. 6) दुपारनंतर अंमलबजावणी झाली. गेले दोन दिवस उलाढाल थांबली आहे. याचा सर्वाधिक फटका कपडे आणि सराफी दुकानांना बसला आहे. लग्नसराई आणि सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहक खरेदीकडे वळलेले आहेत. याचवेळी दुकाने बंद झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. गुढीपाडव्याला सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी झुंबड उडते. 13 एप्रिलला पाडवा असल्याने त्या दिवशी दागिने आणले जातात. ऐनवेळी बाजार बंद पडल्याचा मोठा फटका बसू शकतो. विवाह सोहळ्यांना परवानगी असली तरीही त्यासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी कुठे करायची? हा प्रश्‍नच आहे. याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी व्यापार्‍यांकडून मागणी होत आहे.