मिनी लॉकडाऊनने कलाकारांच्या उपजीविकेला झळ

रत्नागिरी:- संगीत, नृत्य ही माणसाच्या आरोग्याशीही निगडित आहे. नृत्यातून अनेक कलाकारांनी उंची गाठली, मनोरंजन केले. गेल्या वर्षी लॉकडाउन संपल्यावर जगण्याची आशा पल्लवित झाली असतानाच ‘ब्रेक द चेन’च्या मिनी लॉकडाउनमुळे नृत्य वर्गातून कलाकारांच्या उपजीविकेच्या साधनाला झळ पोचली. आता जगणं कठीण झाले. गंभीर परिस्थितीशी सामना करावा लागत असल्याची खंत महाराष्ट्र नृत्य परिषदेचे अध्यक्ष अमित कदम यांनी व्यक्त केली.  

कोविडच्या वैश्विक महामारीमुळे सर्वांचेच जगणे अवघड होऊन बसले आहे. नृत्य आरोग्याशी निगडित, वजन कमी करणे, मनोरजंन, स्पर्धा, नृत्यातून जनजागृती अशा अनेक स्तरावर नृत्यातून वेगळेपण दाखविण्याची संधी नृत्य कलाकारांना मिळते. नृत्य दिग्गजांनी संपूर्ण महाराष्ट्रात ठसा उटवला आहे. त्यातून पुढे आलेल्या अनेक कलाकारांनी स्वतःचे डान्स क्‍लास सुरू केले.

कदम यांच्या आकार डान्स अकादमीतर्फे रत्नागिरीत तीन नृत्य वर्ग आहेत. सुमारे ५५ विद्यार्थी त्यांच्या नृत्यवर्गात प्रशिक्षण घेतात. लॉकडाउनमध्ये शाळा बंद झाल्या. नृत्य वर्ग बंद, यामुळे नृत्यवर्गावर मोठा परिणाम झाला. नृत्य वर्गाचे जागेचे भाडे, बॅंकेचे हप्ते अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच नृत्य कलाकारांना राजाश्रय नाही. त्यामुळे या परिस्थितीत जगणे कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. नृत्य वर्ग हे राज्यात खेड्यापाड्यापर्यंत उपजीविकेचे साधन बनले आहे. 

शालेय स्नेहसंमेलन, स्पर्धा, चॅनेलचे कार्यक्रम, व्यावसायिक इव्हेंट्‌स आणि लग्न समारंभातील संगीत अशा अनेक माध्यमातून हा व्यवसाय राज्यात उदयास आला असतानाच मिनी लॉकडाउनचे संकट येऊन ठेपले. त्यामुळे या सर्व कलाकारांचे जगणे दुरापास्त झाले आहे. नृत्य वर्गावर अवलंबून असणाऱ्या ५० टक्‍क्‍यांहून अधिक कलाकारांना किराणा, मुलांचे शिक्षण, कर्ज त्यांचे हप्ते या साऱ्यांमुळे या व्यवसायावर निर्भर असणारे हे कलाकार आता रस्त्यावर आले आहेत.