उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सोमवारी मतमोजणी
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या 56 तर पंचायत समित्यांच्या 112 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. मिनी मंत्रालय असे संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून शनिवारी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात सरासरी 55.79 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली असून सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मागील पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला होता. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे. जिल्हा परिषदेच्या 56 आणि नऊ पंचायत समित्यांमधील 112 जागांसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्या पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी साडेसात वाजल्या पासून मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. प्रशासनाने देखील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
शनिवारी सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 1 लाख 31 हजार 916 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासांमध्ये 11.24 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. यात 76 हजार 221 पुरुष मतदारांनी तर 55 हजार 684 स्त्री मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात ते 11.30 या कालावधीत जिल्ह्यात 26.48 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. एकुण 11 लाख 73 हजार 902 मतदारांपैकी 11.30 वाजेपर्यंत 3 लाख 10 हजार 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 1 लाख 60 हजार 276 पुरुष तर 1 लाख 50 हजार 527 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुपारी 1.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात 39.52 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 63 हजार 904 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 2 लाख 26 हजार 150 पुरुष आणि 2 लाख 37 हजार 753 स्त्री मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर मतदानाचा टक्का काही प्रमाणात घसरला. दुपारी 1.30 ते 3.30 या दोन तासात केवळ केवळ 7.86 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत एकूण 5 लाख 56 हजार 159 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 2 लाख 69 हजार 826 पुरुष तर 2 लाख 86 हजार 332 स्त्री मतदारांनी मतदान केल्याची नोंद करण्यात आली.
मतदानाच्या अंतिम दोन तासात मतदानासाठी मतदान केंद्रांवर मतदारांनी पुन्हा गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी होती. मतदानाच्या मुदतीमध्ये जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह नऊ पंचायत समित्यांसाठी सरासरी 55.79 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदान प्रक्रिया पार पडताच प्रत्येक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन पोलिस बंदोबस्तात प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. प्रत्येक स्ट्राँग रूम बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून अवघ्या काही तासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.









