मित्राला सोडण्यासाठी गेला अन् परतलाच नाही

आई – वडिलांचा आधार हरपला; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तो आमचा आधार बनेल, असे स्वप्न बघत असतानाच काळाने घाला घातला. आधाराची काठी निघून गेल्याने आता कोणाकडे बघून जगायचे? असा प्रश्‍न अयानच्या आई-वडिलांसमोर पडला आहे. दरम्यान, ओव्हरटेकच्या नादातच अयानचा बळी गेला असून ओव्हरटेक करणार्‍या ट्रक चालकाविरोधात शहर पोलीस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील परटवणे येथील बोरकरवाडीजवळील वळणात ओव्हरटेक करणार्‍या ट्रकची समोरुन येणार्‍या दुचाकीला जोराची धडक बसून अपघात झाला. या अपघातात साखरतर येथील २२ वर्षीय तरुण अयान सईद साखरकर या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की त्याच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.

अयान हा कॉलेज तरूण असून तो त्याच्या मित्राला घरी सोडण्यासाठी कोकणनगर येथे गेला होता. आपली दुचाकी घेऊन तो रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मित्राला घेऊन कोकणनगर येथे गेला. त्या ठिकाणी माघारी फिरताना मित्रासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि पुन्हा तो आपल्या घरी जायला माघारी फिरला.

रविवारी सकाळी अयान हा घरातून बाहेर पडला त्यावेळी आईने त्याला लवकर घरी ये असे सांगितले होते. मित्राला कोकणनगर येथे सोडल्यानंतर आईने लवकर घरी बोलावले आहे, याची आठवण होताच अयान मित्राचा निरोप घेऊन माघारी फिरला होता. पुढे काय घडणार आहे याची पुसटशी कल्पनादेखील त्याला नसावी.

परटवणेकडून साळवीस्टॉपकडे जाणारा रस्ता हा अयानसाठी काही नवीन नव्हता. त्याचे नेहमी येणे-जाणे या रस्त्यावरून होत असे. त्यामुळे या रस्त्यावर वळणे कुठे आहेत? धोकादायक स्पॉट कोणते आहेत? याची पूर्ण माहिती अयानला होती. त्यामुळे अयान हा शिस्तीत आपली दुचाकी घेऊन साखरतरच्या दिशेने जायला निघाला होता.

अयान हा साखरतरला जायला निघालेला असताना फिनोलेक्स कॉलनी येथील उतार उतरून तो परटवणे-बोरकरवाडी दरम्यान असणार्‍या एका वळणावर आला असता समोरून येणार्‍या मासेवाहू ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात अयानला ठोकर दिली आणि त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

अयान हा कॉलेज करीत होता. कॉलेज करून तो आपल्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी फावल्या वेळेत बोटीवर मासेमारी करण्यासाठी जात असे. त्याचे वडिलदेखील बोटीवर मासेमारी करण्यासाठी जात असत. कुटुंबाची काळजी असणारा अयान हा खूप मेहनती होता.

अयानच्या अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच त्याच्या मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली होती. सर्वांमध्ये मिळूनमिसळून वावरणारा तरूण अपघाती मृत्यू पावल्याने सारेच हळहळले होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तर साखरतर गावावर मोठी शोककळा पसरली होती.

साखरतर येथील तरूण अयान याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर साखरतर येथील ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास विरोध केला होता. वातावरण तप्त झाले होते. अखेरीस पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत घातली आणि त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणात ट्रक चालक दिलावर महंमद सोलकर याच्याविरोधात भादंविक ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ अन्वये गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला शहर पोलिसांनी अटक केली.