किरण सामंत यांचा व्हाट्सअप स्टेटसद्वारे कोणाला इशारा?
रत्नागिरी:- रत्नागिरी‚सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन अद्यापही शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमत झाल्याचं दिसत नाही. महायुतीची उमेदवारीचा गुढीपाडव्याचा मुहुर्त हुकला आहे. तर शिंदे गटाकडून ना.उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा असताना, ना.नारायण राणे मात्र माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. मंत्री ना.नारायण राणे वारंवार जाहीरपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत असताना शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींदरम्यान ना.उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हाट्सअप स्टेटसमुळे चर्चा रंगली आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत रत्नागिरी‚सिंधुदुर्गमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांचा व्हाट्सअप स्टेट नेमका कोणासाठी होता ? त्यांच्या निशान्यावर नेमक कोण आहे. हे येत्याकाही दिवसात स्पष्ट होणार आहे.
किरण सामंत यांनी व्हाट्सअपला अजित पवारांच्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. अजित पवारांनी या भाषणात म्हटलं होतं की, जर मिठाचा खडा पडला, तर आमदारकीसाठी कोणाच्या बापाला ऐकणार नाही. अजित पवारांचा व्हिडीओ शेअर करत किरण सामंत यांनी धमकीवजा इशाराच दिल्याची चर्चा आहे. किरण सामंत यांना या स्टेटसमधून नेमकं काय सांगायचं आहे आणि कोणाला इशारा द्यायचा आहे याची चर्चा रंगली आहे. किरण सामंत यांनी व्हिडीओ शेअर करताना वरती लिहिलं आहे की, मिठाचा खडा, कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही.
मंत्री अजित पवारांनी दि. ४ फेब्रुवारीला बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यात भाषण केलं होतं. यावेळी माPया मताचाच खासदार हवा, असं म्हणताना अजित पवारांनी थेट बारामतीच्या मतदारांनाच इशारा दिला होता. लोकसभा व विधानसभा या दोन्ही वेळेला मला तुमची साथ लागेल. आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी, शाहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो. त्यासाठी माPयाच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, त्यावेळी कुणाच्या बापाचे ऐकणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांनी माघार घेतल्याचीही चर्चा होती. त्यांच्या एका पोस्टमुळे ही चर्चा होती. पण उदय सामंत यांनी हा दावा फेटाळला होता. आपण किरण सामंतांजवळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क केला आणि ही पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती उदय सामतांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली होती. इतकंच नाही तर आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा कायम असल्याचंही सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांनी ठेवलेला व्हाट्सअप स्टेटस चर्चेत आले आहे.