बामणोली येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील मारळ ते बामणोली रोडवर शनिवारी सायंकाळी एका भरधाव सिमेंट मिक्सरने दिलेल्या धडकेत काजू बागेतून काम करून घरी परतणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बामणोली मधलीवाडी येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी दीपक पांडुरंग गराटे (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृत महिला काजू बागेची साफसफाई करून मारळ-बामणोली रस्त्याने डाव्या बाजूने पायी चालत घरी येत होत्या. बामणोली कातळस्टॉपपासून ६०० मीटर अंतरावर एका मोरीचे बांधकाम सुरू आहे.
या ठिकाणी खडी आणि वाळू मिक्स करणारा एक्सिस मिक्सर (क्र. MH 09 GZ 2014) वरील चालक मोनू आत्मज मांगी (वय २३, रा. ललितपूर, उत्तर प्रदेश) हा आपले वाहन अतिशय वेगात आणि निष्काळजीपणे पाठीमागे घेत होता. यावेळी त्याने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे मिक्सरचे चाक महिलेच्या डाव्या पायावरून गेल्याने त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला आणि डाव्या कानाच्या वरच्या बाजूला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना ‘मृत’ घोषित केले.
या प्रकरणी देवरुख पोलिसांनी आरोपी चालक मोनू मांगी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









