मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनीची लॉटरी

रत्नागिरी:- मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या दिवसापासून मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा मासा, कोळंबी आणि काही प्रमाणात सुरमई मिळू लागली आहे. ही मासळी पकडण्यासाठी आरे-वारे, गणपतीपुळे, जयगड किनार्‍यापासून काही अंतरावर मच्छीमारांच्या उड्या पडल्या. मच्छीमारी नौकांचे जथ्थेच्या जथ्थे या परिसरात जाळी मारत होते. तीस हजारापासून एक लाखापर्यंत बांगडा मच्छीमारांच्या जाळ्यात मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात होते.

दोन महिने मासेमारी वरील बंदी कालावधी उठल्या नंतर जिल्ह्यात काही नौकानी मासेमारी करिता आपल्या नौका समुद्रात उतरवल्या. पावसाने देखील उसंत घेतल्याने मासेमारी साठी पोषक वातावरण तयार झाले. पहिल्याच टप्प्यात मच्छीमारांना चांगला रिपोर्ट मिळाल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ट्रॉलर्स्, गिलनेटने मासेमारी करणार्‍यांना बांगडा, कोळंबी आणि सुरमई मासा मिळत आहे. जाळ्यात सापडणार्‍या माशांमध्ये सर्वाधिक बांगडा या माशाचा समावेश आहे. ५० ते १०० डिश (एक डिश ३२ किलो) मासा मिळू लागली आहे.

मागील दोन दिवसांपासून काळबादेवी ते जयगड या परिसरातील किनारी भागात बांगडा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हा मासा पकडण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील मच्छीमारांच्या उड्या पडल्या आहेत. शेकडोच्या संख्येने मासेमारी करणार्‍या मच्छीमारी नौकांचे ग्रुप किनार्‍यावरून पाहायला मिळत होते. जाळी टाकून तासनतास नौका समुद्रात ठाण मांडून होत्या. काहींच्या जाळ्यात पन्नास डिश तर काहींच्या साठ डिश मासा मिळत होता.