मासेमारी व्यवसायावर संकट कायम; निर्यातक्षम मासळीची वानवा

रत्नागिरी:- मासेमारीचा हंगाम सुरू  झाल्यापासून परदेशात जाणारी मासळी  निर्यात करणार्‍या कंपन्यांकडे फारच कमी प्रमाणात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मच्छीमार नौकांना मासळी मिळण्यास नियमितपणा नसल्याचे मासळी निर्यात करणार्‍या एका कंपनी मालकाने सांगितले. 

बांगडा, सुरमई, बळा, ढोमा, म्हाकुळ, तार्ली सर्व प्रकारची कोळंबी  आदी प्रकारची मासळी रत्नागिरीतून परदेशात निर्यात होते. गद्रे मरीन, नाईक , कारुण्य, जिलानी मरीन आणि एसकेआर या कंपन्यांकडून मासळी निर्यात होते. सर्व प्रकारच्या मच्छीमार नौकांना समुद्रात मिळणारी मासळी या कंपन्यांकडे विकली जाते.

मासेमारीच्या यंदाच्या मोसमात गेल्या दोन महिन्यांपासून केवळ 15 ते 20 टक्के नौकांनाच मासळी मिळण्याचा रिपोर्ट चांगला आहे. उर्वरित नौकांना आठवडाभर चांगल्या प्रमाणात मासळी मिळाली तर दुसरा आठवडा तोट्याचा जातोय, अशा प्रमाणात कंपनीकडे मासळी येत असल्याचे एसकेआर कंपनीचे सुरेशकुमार खाडीलकर यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणार्‍या 3 हजार 77 मच्छीमार नौका आहेत. यामध्ये 3 हजार 519 यांत्रिकी तर 442 बिगर यांत्रिकी नौका आहेत.

नौकांना सध्या एक आठवडा चांगली किंमत देणारी मासळी मिळाली तर दुसरा आठवडा फिशमिल कंपन्यांना जाणारी बारीक मासळी म्हणजेच कुटी मिळत आहे. सध्या बांगडा बर्‍यापैकी प्रमाणात कंपन्यांकडे येत असल्याचेही एसकेआर कंपनीचे खाडीलकर यांनी सांगितले.