लांजा येथील विनायक दळवी बेपत्ता,शोधकार्य सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका बोटीतून भडे पिंपळवाडी तालुका लांजा येथील विनायक बाळकृष्ण दळवी यांनी अचानक समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना काल, बुधवार, दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील भडे पिंपळवाडी येथील विनायक दळवी हे उपजीविकेसाठी रत्नागिरीतील मासेमारी बोटीवर काम करत होते. मागील चार वर्षांपासून ते मिरकरवाडा येथील रफीक (पप्पू)यांच्या बोटीवर कामाला होते.काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात असताना विनायक दळवी यांनी अचानक चालत्या बोटीतून समुद्रात उडी घेतली.ही घटना लगेचच बोटीवरील इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आली.बोटीच्या मालकाला घटनेची माहिती मिळताच रफीक यांनी तातडीने धाव घेतली आणि विनायक दळवी यांचा समुद्रात कसून शोध सुरू केला.
सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली असता, विनायक दळवी यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे समुद्रात उडी मारली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.बोटीचे मालक रफीक यांनी मिरकरवाडा येथील पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद केली आहे.पोलीस अधिकारी चव्हाण हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत आणि विनायक दळवी यांचा शोध घेण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.









