गुहागर:- पाचमाड येथील खडकाळ परिसरात मासे मारताना तोल जाऊन समुद्रात पडल्याने दोघा तरुणांचा मृत्यू झाला. आरेगाव (ता. गुहागर) येथील सिद्धांत संदेश साटले (वय २३, रा. कलमवाडी) आणि प्रतीक किसन नावले (वय २५, नागदेवाडी) अशी मरण पावलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.
सिद्धांत साटले आणि प्रतीक नावले हे दोघेही गेले काही दिवस मासेमारीसाठी जात होते. दि. २१ जून मासे पकडण्यासाठी ते गेले असता ते सायंकाळपर्यंत परत आले नाहीत, म्हणून दोघांचे मित्र त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडले. बाग परिसरातील पाचमाड समुद्रकिनारी सुरूच्या झाडाखाली दुचाकी उभी करून ते दोघे खडकात गेले होते. जाताना आपले मोबाइल दुचाकीमध्ये ठेवून गेले होते. शोध घेणारी मंडळी सोमवार सायंकाळी खडकापर्यंत जाऊन परतली. भरतीच्या वेळी ते दोघे जिवंत सापडतील, अशी आशा होती. म्हणून रात्री साडेबारा वाजेपर्यंत शोध सुरू होता. पण त्याला यश आले नाही. पुन्हा मंगळवारी पहाटे ५ वाजता शोधमोहिमेला सुरवात झाली. सकाळी ९ च्या सुमारास गुहागर पोलीस ठाण्यात सिद्धांत आणि प्रतक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास गुहागर वरचापाट मोहल्ला येथील समुद्रकिनाऱ्यावर सिद्धांतचा मृतदेह सापडला, तर त्याच दरम्यान गुहागर बाजारपेठ परिसरात प्रतीकचा मृतदेह सापडला. दोघांच्या डोक्याला तसेच शरीरावर जखमा होत्या. त्यावरून या दोघांनी खडकांमधून समुद्रातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे लक्षात येत होते. दुर्दैवाने लाटांच्या माऱ्यामुळे समुद्रातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ते अनेकवेळा खडकांवर आपटले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.