रत्नागिरी:- मासेमारी बंदी काळात पावसाळ्यात समुद्रात मासेमारी करणार्या आतापर्यंत सहा नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवाया सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्या नौका रत्नागिरी तालुक्यातील आहेत.
पावसाळी मासेमारी बंदी १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत असते. यंदा पाऊस उशिराने सुरू झाल्याने अनेक मच्छिमार नौकांनी पावसाळी मासेमारी बंदी झुगारून समुद्रात मासेमारी करण्याचा धोका पत्करला. परंतु, कासारवेलीतील ग्रामस्थांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाला कळवून धोकादायक वेळेत मासेमारी केली जात असल्याचे सांगितले. त्यानुसार परवाना अधिकार्याच्या नेतृत्वाखालील पथकाने कासारवेली जेटीवर जाऊन कारवाई केली. पावसाळी मासेमारी बंदीकाळातील जून महिन्यातच या सर्व कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाई झालेल्या नौका ट्रॉलींग आणि गिलनेट प्रकारातील आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी एन. व्ही. भादुले यांच्यासमोर खटला चालणार आहे. गेल्यावर्षी पावसाळी बंदीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत १० नौकांवर कारवाई झाली आहे.