रत्नागिरी:- शहराजवळील मिरकरवाडा समुद्रात खोल मासेमारी करत असताना खलाशाच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जागुराम जितूराम चौधरी (वय ४९, रा. गाव चौमाला जि. कैलाली. नेपाळ. सध्या ः मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत जागुराम चौधरी हे रुक्साना अमिरुद्दीन भाटकर यांच्या मालकीच्या अकीफ दानिश बोटीवर खलाशी म्हणून कामाला होते. शनिवारी (ता. ८) पहाटे अकीफ दानिश या बोटीने मासेमारी करण्यासाठी खलाशी व तांडेल असे मिरकरवाडा खोल समुद्रात मासेमारी करत असताना जागुराम चौधरी यांच्या छातीत दुखू लागले. तात्काळ त्यांना मिरकरवाडा जेटी-२ येथून रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









