रत्नागिरी:- 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. या वर्षी मासेमारी बंदीचा कालावधी 60 दिवसांवरून 76 दिवसांवर इतका वाढवण्यात आला होता. वाढीव 15 दिवसांच्या बंदिनंतर नव्याने मासेमारी हंगाम सुरू करण्यासाठी मच्छिमारी तयारी पूर्ण केली आहे.
पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा हंगाम असल्याने मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावे, यासाठी दरवर्षी या कालावधीत मासेमारीवर बंदी घालण्यात येते. यामुळे माशांची संख्या वाढण्यास मदत होते आणि भविष्यात मत्स्यसंपत्तीचे संरक्षण सुनिश्चित होते. यंदा महाराष्ट्र शासनाने यांत्रिक व यंत्रचालित मासेमारी नौकांसाठी 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मासेमारीबंदी लागू केली. मात्र महाराष्ट्र शासनाने यंदा राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत, म्हणजे एकूण 76 दिवसांपर्यंत वाढविला. या कालावधीत केवळ 2 टक्के मासेमारी नौका सुरू झाल्या. पावसाळी वातावरण असल्याने मच्छीमारांनी समुद्रात नौका उतरण्याचा धोका पत्करला नाही. बंदी कालावधीत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी मत्स्य विभागाने खास उपाययोजना हाती घेतल्याने राज्याच्या सागरी हद्दीत होणारी मासेमारीवर चाप लावण्यात मत्स्य विभागाला यश आले.
आता 15 ऑगस्ट पासून अधिकृतपणे मासेमारीचा नवा हंगाम सुरू होणार आहे. पर्ससीन मासेमारी वगळता अन्य सर्व प्रकारची मासेमारी करण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. मासेमारी बोटींची डागडुजी करण्यापासून ते मासेमारी जाळ्यांची दुरुस्ती करण्यापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तांडेल, खलाशी सर्व कामगार देखील बोटींवर दाखल झाले आहेत.









