रत्नागिरी:- मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ३१ मे नंतर मासेमारी बंदी लागू होणार असली तरीही ट्रॉलिंग, गिलेनेटद्वारे मासेमारी करणार्यांसाठी शेवटचा आठवडा महत्त्वाचा ठरत आहे. किनारी भागात काही प्रमाणात कोळंबी मासा मिळत असल्याने त्यावर अनेकांच्या उड्या पडल्या आहेत. प्रवाह बदलामुळे कोळंबी किनार्यावर येऊ लागली असे काही मच्छीमारांचे निरीक्षण आहे. गणपतीपुळे, गावखडी, जयगड किनारी अनेक मच्छीमार मासेमारी करताना दिसत आहेत.
यंदा हंगामाच्या सुरवातीलाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे आरंभीलाच मासेमारीत व्यत्यय आला. त्यानंतर प्रत्येक महिन्यात वातावरण बदलाचा फटका मच्छीमारांना बसला. शासनाच्या आदेशानुसार मासेमारी हंगाम संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत. यावर्षी बांगडा आणि तार्ली या माशांनी मच्छीमारांना चांगलेच तारले आहे; मात्र तुलनेत कोळंबीचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या चार ते पाच वर्षात तार्ली मासा मिळालेला नव्हता. तो यंदा सापडू लागल्याने भविष्यात मच्छीमारांना अच्छे दिन येतील.
आठ दिवसांपूर्वी वातावरण बदल झाला असून किनारी भागात पावसाचे संकेत मिळू लागले आहे. प्रवाह बदलामुळे खोल पाण्यातील कोळंबी किनारी भागाकडे वळलेली आहे. ही कोळंबी पकडण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. गेल्या काही दिवसात वादळी वार्यांमुळे खोल समुद्रातील मासेमारीला ब्रेक लागला होता. त्यामुळे बांगडा, पापलेट, सुरमई सारख्या माशांचे दर गगनाला भिडले होते. त्यात कोळंबीचाही समावेश होता. सध्या दोनशे रुपये किलोपासून साडेतिनशे रुपये किलो पर्यंत दर मिळत आहे. अजुन आठ दिवस किनारी भागात कोळंबी मिळत राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी जयगड, गणपतीपुळे, गावखडी, राजापूर, हर्णे परिसरात कोळंबीसाठी जाळं मारण्यास सुरवात केली आहे. आरे-वारे जवळ दररोज मच्छीमारी नौका जाळं टाकून राहतात. पर्ससिननेट मासेमारी १ जानेवारीपासून थांबली होती. त्यानंतर ट्रॉलिंगसह अन्य मासेमारीला वेग आला होता. त्यांना बर्यापैकी मासे मिळू लागले होते; परंतु वादळ आणि बदलते प्रवाह याचा फटका गिलनेटने मासेमारी करणार्यांना बसला आहे. दहा महिन्यातील पाच महिने वाया गेल्याचे अनेक मच्छीमारांचे मत आहे.